Sunday, August 2, 2020

माझा शेतकरी राजा


शेतकरी माझा........

          दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी.व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. एकीशी प्रेम, दुसरीशी लफडं आणि तिसरीशी बिझनेस. चौथी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहून त्याचं अकौंट झिरो करते. म्हणे गुणी कलावंत. हत्या की आत्महत्या यावर दोन महिने चर्वित-चर्वण चाललंय. कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय? 33000 शेतकर्‍यांनी शेता-बांधावरच्या झाडांना लटकवून आपला जीवन प्रवास संपवला. त्यांची मुलं-बाळं उघड्यावर पडली. किती जणांनी मेणबत्ती मोर्चे काढले? किती जणांनी शासनाला जाब विचारला? किती निर्माते उपाशी झोपले?
           अहो इथे विधवा पत्नी, अनाथ मुलं असहाय्य आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला. चार्‍यावाचून ती मुकी जनावरे तडफडून मेली. बँक अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी दहाव्यालाच हजर. अशावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाने न्याय मागायचा कुणाकडे? सुशांत सिंह राजपूतकडे तर कोट्यावधी रुपये होते. त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेक जणींनी त्याला लुटलं. इथं शेतकर्‍याला निसर्ग आणि शासन व्यवस्था लुटते. त्याच्यासाठी कधी तरी अश्रू ढाळणार की नाही?
              मी ‘नाम’ संस्थेच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचं अभिनंदन करतो. त्यांनी हजारो विधवांना रोखीने - चेकने अर्थसाह्य करून त्यांच्या जीवनात थोडा आनंद पेरण्याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूत कोट्यावधी रुपये कमावून प्रेम-लफडी करून मानसिक दिवाळखोरीत जात आत्महत्या करत असेल तर त्याला एक न्याय व शेतकर्‍याला दुसरा न्याय हे कसं काय? म्हणजे, पडद्यावर नाचणारा, प्रेम- लफडी करून ‘पेज थ्री’ पार्ट्या झोडपणारा ‘माणूस’?, दररोज 12-14 तास काबाडकष्ट करून तुटलेल्या - फुटलेल्या घरात राहून आपल्या पत्नी-मुलांबाळांचं संगोपन करू पाहणारा ‘कचरा’? कुणीही यावे ‘डस्टबिन’ मध्ये टाकावे? या समाजव्यवस्थेचीच चीड येते.
            सध्या कोरोनाचा महाभयंकर काळ सुरू आहे. या चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दोन वेळचं जेवू कोण घालतोय? शेतकरी! तो राबतोय म्हणून आपण खातोय! तो घरात बसला असता तर आपलाही ‘सुशांत’ झाला असता. त्याच्या पदरात काय पडतंय? 10 रु. किलो टोमॅटो, 5 रु. कि. कांदे, 10 रु. कि. बटाटे, 2 रु. मेथीची जुडी, 2 रु. कोथिंबीर जुडी, 18 रु. लि. दूध. चार टेम्पो शेतकर्‍याचा माल विकून जेवढा पैसा येईल, तेवढ्या पैशात ‘सुशांत’ रोज सकाळी नाश्ता करायचा. आणि आपल्या मैत्रीणींनाही खावू घालायचा. नाश्ता, जेवण जेव्हा संपलं तेव्हा त्यांनी टांग वर केली आणि यानेही आपला बिस्तरा गुंडाळला. टी. व्ही. मिडीया, वृत्तपत्र मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी. विदारक चित्र आहे.
            माझा विरोध इतकाच आहे की ज्यांना भारतीय संस्कृतीत तिळमात्र इंटरेस्ट नाही त्यांना फक्त पैसा या एकाच संकल्पनेत जगायचं आहे, त्यांना आपण कशासाठी उचलून धरायचं.! शोधायला गेलं तर आपल्या स्वतःच्या जीवनसाथीशी यांना एकनिष्ठ राहता येत नाही ते देशाशी के एकनिष्ठ राहतील. त्यामुळे या नट-नट्यांना सोडून माझा आपला शेतकरी टिकला पाहिजे, शेतीसाठी नवेनवे प्रयोग आले पाहिजेत, शेतकरी प्रोत्साहित झाला पाहिजे यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

शब्दांकन:- श्री विकास राऊत(MCA, BJ, Bed)

Wednesday, April 15, 2020

या ऋतु मधला पहिला पाऊस

Vikaskraut@gmail.comपहिला पाऊस …

पहिला पाऊस … आत्ता नुकताच या वर्षातला पहिला-वहिला पाउस पडला .पाउस तर अगदीच थोडा पडला पण या पहिल्या पावसाचा तो सुगंध मनात मात्र  दरवळत राहील .लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ,न चुकता सर्वांनाच हा सुगंध येताच पटकन जाऊन ती ओली-ओली माती खावीशी वाटण्याची ही भावना अदभूत आहे .
                         
                            आज पहिला तो पाऊस
                            गारवा देऊन गेला ,
                            गारव्यात त्या अनोखी
                            एक आठवण देऊन गेला  …..

पहिल्या पावसाच्या सुगंधात का कुणास ठाऊक पण मनातल्या कोपर्यात दडलेल्या ,किंबहुना आपल्याला परिस्थितीपायी दडवाव्या लागलेल्या त्या खास आठवणी नकळत उफाळून येतात आणि सुरु करतात बाहेरच्या पावसासोबत ,मनात आठवणींच्या पावसाचा खेळ ….
                         
                            थेंबांच्या त्या गारव्यात
                            एक आठवण देऊन गेला ,
                            आज न भिजताच
                            मला हा चिंब भिजवून गेला  ……

आयुष्यात पहिल्या येणाऱ्या गोष्टंच ,त्या पहिल्या क्षणांचे मोल हे ते क्षण निघून गेल्यावरच कळत ,जस पाहिलं प्रेम .काय जादू असते त्या पहिल्या प्रेमात ,त्या क्षणांमध्ये कि आजपण त्या आठवणी ,मन व्यापून टाकतात .कितीही दाबून टाकल्या तरी या पहिल्या पावसाच्या सुगंधात त्या हळूच डोक वर काढतात .मग सुरु होतो थेंबांचा तो अनोखा खेळ ,बाहेर रप-रप पडणारे पावसाचे ओले-ओले थेंब आणि इथे मनात रिप-रिप पडणारे आणि चिंब भिजवून टाकणारे ,आठवणींचे ते थेंब …

                           बाहेरचा तो पाऊस
                           हे शरीर भिजवून गेला
                           पण ,
                           आठवणींचा आतला पाऊस
                           डोळे पण भिजवून गेला …...

आठवणी चांगल्या असो वा वाईट ,पण त्या आठवणीच असतात ,कितीही आवडल्या तरीही त्या जुन्याच असतात .काही क्षणांसाठी आल्या तरी त्या सोडून पुढच आयुष्य जगावच लागत .थेंब छोटा असो वा मोठा ,तो अंगावर पडल्यावर भिजावच लागत .पाउस तर थांबला थोड्याच वेळात ,पण या आठवणी नाही थांबत ,कितीपण गरम भजे खाल्ले तरी ,आठवणींचा हा गारवा नाही थांबत .....
                       
                            काही क्षण का होईना
                            तिची साथ देऊन गेला
                            आणि ,
                            आजचा हा पहिला पाउस
                            अनोखा गारवा देऊन गेला ……
पहिला पाऊस 

Wednesday, May 1, 2019

संहिता संपवा

www.vikasparv.blogspot.inसंहिता संपवा

            महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता, मतदानापर्यंतची प्रक्रिया पार पडलेल्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने आचारसंहितेत सवलत द्यायला हवी..
            हिवाळ्यापूर्वी आणेवारीवर विसंबून काही गावांत जाहीर केलेला दुष्काळ आणि आताची स्थिती यांत फरक आहे. तातडीने निर्णय होणे येत्या महिन्याभरासाठी अत्यावश्यक आहे..
लोकसभा निवडणुकांचे महाराष्ट्रापुरते मतदान सोमवारी एकदाचे संपले. प्रचाराची दिवसेंदिवस घसरत गेलेली पातळी, मुद्दय़ांच्या अस्तित्वाशिवाय होत असलेली गुद्दय़ांची देवाणघेवाण आणि एकंदरच मतदारांची उदासीनता या सर्व बाबी आज निदान महाराष्ट्रापुरत्या तरी संपुष्टात येतील. एका अर्थाने महाराष्ट्र निवडणुकांच्या मुद्दय़ावर सुटकेचा नि:श्वास टाकू शकेल. पण तात्पुरता. याचे कारण आग ओकणारा सूर्य. अजून चैत्रही पूर्ण संपलेला नाही आणि महाराष्ट्र पार कोळपून जाऊ लागला असून या वाढत्या तापमानास आणखी किमान एक महिना तरी कसे सामोरे जायचे ही चिंता राज्यास भेडसावू लागलेली आहे. प्रश्न नुसत्या वाढत्या तापमानाचा नाही. तो प्रचंड प्रमाणावर आटत चाललेल्या जलसाठय़ांचा आहे. तापमान वाढले की पाण्याची मागणी वाढणार हे समजून घेण्यास तज्ज्ञाची गरज नाही. परंतु जमिनीखालील जलसाठय़ांचे इतके आकसून जाणे राज्यासाठी कमालीचे धोकादायक बनले असून जवळपास एकतृतीयांश राज्य दुष्काळाच्या सावटाखाली येते की काय, अशी परिस्थिती दिसते. वास्तविक गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारने काही भागांत दुष्काळ जाहीर केला. आणेवारी हा त्याचा आधार. परंतु हिवाळ्याच्या आधी ज्यावर आधारित दुष्काळ जाहीर झाला ती परिस्थिती आणि आताची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यानुसार दुष्काळ मोजमाप अवस्थेतही बदल करावा लागतो आणि त्यानुसार उपायांच्या आकारातही फेरफार करावा लागतो. अन्य कोणता काळ असता तर अशा प्रसंगी कसे वागायचे याचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे सरकारी यंत्रणा कामास लागली असती. तथापि यंदा तसे करण्याची सोय सरकारी यंत्रणांना नाही. साधे शासन आदेशदेखील सरकारला काढता येणार नाहीत.
कारण निवडणूक आचारसंहिता. निवडणुकांची घोषणा झाली की या आचारसंहितेचा अंमल सुरू होतो आणि मतमोजणीपर्यंत तो कायम राहतो. ते योग्यच. आचारसंहितेच्या अभावी सत्ताधारी किती धुडगूस घालत होते आणि आचारसंहिता असतानाही तीस ते कसे वाकवू शकतात याची अनेक उदाहरणे इतिहास आणि वर्तमानात आढळतील. पण तरीही या आचारसंहिता नियमांचा फेरविचार करावा अशी मागणी करण्याची वेळ आलेली आहे हे निश्चित. पूर्वीसारख्या हल्ली निवडणुका या एकाच दिवसात होत नाहीत. सुरक्षा यंत्रणांवरील वाढता तणाव लक्षात घेता तसे करता येणेही अशक्य. त्यामुळे देशात एकाच दिवसात मतदान उरकले जावे ही मागणी असंभवतेच्या जवळ जाणारी. परंतु ज्या वेळी निवडणुका सात सात टप्प्यांत होणार असतात त्या वेळी तरी या आचारसंहितेच्या अमलाची फेरचर्चा व्हायला हवी. यंदा लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली १० मार्च या दिवशी. त्यानंतर मजल दरमजल करीत या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल ते १९ मे या दिवशी. आणि मतमोजणी त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे २३ मे रोजी. त्या दिवशी आचारसंहिता संपेल.
याचा अर्थ जवळपास अडीच महिने संपूर्ण देश निवडणूक आचारसंहितेच्या अमलाखाली राहील. या काळात कोणत्याही सरकारला, यात राज्य सरकारे देखील आली, कोणतेही काम नव्याने काढता येणार नाही. यात नवीन काही नाही आणि टीका करावे असेही काही नाही. आपली सरकारे जनहिताच्या कामांसाठी आसुसलेली असतात आणि आचारसंहितेमुळे हे जनहित त्यांना साधता येत नाही, असे काही नाही. तथापि दुष्काळासारख्या गंभीर समस्या काळात तरी सरकारच्या मानेवरील हे आचारसंहितेचे जू काढण्याचा विचार व्हायला हवा. याचे कारण ज्या तीव्रतेचा दुष्काळ राज्यात आहे ते पाहता सरकारला दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती द्याव्या लागतील, चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, पिण्याचे पाणी पुरवण्याच्या काही नव्या योजना हाती घ्याव्या लागतील आणि त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागेल. दुष्काळ, अतिवृष्टी किंवा गारपिटीचे संकट आल्यास साधारणपणे १० हजार कोटी रुपयांच्या आसपास अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागतो. आधीच राज्याची आर्थिक परिस्थिती तोळामासा. वित्तीय तूट वाढलेली, खर्चावर नियंत्रण राहिलेले नाही पण तरी महसुली उत्पन्न मात्र स्तब्ध. अशा परिस्थितीत लोकसभेपाठोपाठ अवघ्या पाच-सहा महिन्यांत राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजतील. त्यातही काही गैर नाही. जे होईल ते रीतीप्रमाणेच.
            पण दुष्काळास आणि जनतेच्या हालअपेष्टांना काही रीत नसते. सध्याच ते दिसू लागले आहे. अशा वेळी या जनतेच्या होरपळीवर फुंकर घालावयाची असेल तर सरकारला काही निर्णय झपाटय़ाने घ्यावे लागतील. परंतु त्यात आचारसंहिता आडवी येऊ शकते. वास्तविक महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या राज्यांत या आचारसंहितेत काही सवलत देण्याचा विचार व्हावा. अर्थात याबाबतचा निर्णय असा सरसकटपणे घेता येणार नाही, हे मान्य. कारण लगेचच आपले उत्साही लोकप्रतिनिधी पाणपोया ते स्थानके ते स्वच्छतागृहे यांच्या उद्घाटन/ पायाभरणीचा कार्यक्रम मोठय़ा जोमाने हाती घेतील. त्यांना रोखायला हवे यात शंका नाही. परंतु तरीही दुष्काळी काळाचा अपवाद यासाठी करायला हवा. याचे कारण अवर्षणासारखे अशा प्रकारचे अस्मानी संकट जेव्हा येते तेव्हा त्यास तोंड देण्यासाठी जमेल त्या पातळीवर सरकारी प्रयत्न करावे लागतात. ते करायचे म्हणजे अन्य नियमांना मुरड घालून मदतीसाठी वेगळी वाट चोखाळावी लागते. पण त्या वाटेवर निवडणूक आचारसंहितेचा अडथळा असेल तर सरकारला निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत दुष्काळग्रस्तांना काही मदतच करता येणार नाही.
             ते सत्ताधारी आणि दुष्काळग्रस्त अशा दोन्ही घटकांवर अन्याय करणारे आहे. सरकारसाठी अन्यायकारक कारण विरोधक आणि जनता सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवू शकतात. कारण आचारसंहिता आहे म्हणून असे करण्यास काही मनाई नाही. दुष्काळग्रस्तांवरही ही अवस्था अन्यायकारक कारण त्यांच्या हालअपेष्टांची सत्यता दिसूनही सरकारचे हात आचारसंहितेने बांधलेले. त्यामुळे ही आचारसंहिता उठण्याची प्रतीक्षा करणे इतकेच त्यांच्या नशिबी. नियमानुसार सर्व काही होत गेले तर ही आचारसंहिता २३ मे रोजी संपुष्टात येईल.
             म्हणजे उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा. काही भागांत या काळात वळीव हजेरी लावतो. अनेक ठिकाणी आगामी पावसाच्या अपेक्षेने शेतीपूर्व कामेही सुरू झालेली असतात. पण तोपर्यंत जगायचे कसे हा प्रश्न आहे. राज्याची निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागातील आहे आणि ती कृषी किंवा कृषीवर आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. सातत्याने वाटय़ास येणाऱ्या अवर्षणामुळे या साऱ्या लोकसंख्येपुढे जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. माणसे बोंब तरी ठोकू शकतात. पण प्राण्यांना तीही सोय नसते. पाण्याअभावी प्राण सोडणे हेच त्यांचे प्राक्तन. शरीराची हाडे कातडी फोडून वर आलेल्या अवस्थेत हिंडणाऱ्या गुराढोरांचे तांडेच्या तांडे आताच ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोकाट हिंडू लागले आहेत. त्यांचे हाल पाहवत नाहीत. त्याच वेळी पिण्याच्या पाण्याच्या मुद्दय़ावर प्रांतिक अस्मिताही पेटू लागल्या आहेत. नाशिक-नगरचे पाणी मराठवाडय़ाला देण्यावरून संघर्षांची ठिणगीही पडली होती.
             अशा वेळी आचारसंहिता आटोपती घेण्याची मुभा राज्य सरकारला द्यायला हवी. माणसांनी नियमाप्रमाणे चालावे हे मान्य. पण नियम माणसांसाठी असतात. माणसे नियमांसाठी नव्हेत. अशा वेळी या माणसांचेच अस्तित्व धोक्यात येणार असेल नियमांचे काठिण्य कायम राखण्यात काय हशील? माणसेच जगणार नसतील तर त्या नियमांचे करायचे काय? तेव्हा निवडणूक आयोगाने या संदर्भात विचार करून आचारसंहिता सल करावी. आयोगास तशी बुद्धी होणार नसेल तर राजकीय पक्षांनी एकमुखाने त्यासाठी मागणी करण्याचा शहाणपणा दाखवावा. नियमशून्यता नको, हे खरेच. पण नियमांचा अतिरेकही नको.

Monday, September 10, 2018

बैलपोळा:- सर्जा-राजाचा सण

कृषी प्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव

सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
पोळा : सर्जा-राजाचा सण
पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक धान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. यासणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
           या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
           या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.
         www.vikasparv.blogspot.com  पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍यालाऔक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
          याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

Tuesday, September 4, 2018

शिक्षक मनातले

नमस्कार,
        माझं नाव विकास राऊत. सतत दुष्काळी नावाने प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात मेडशिंगी नावाचं छोटंसं गावात माझा जन्म झाला. याच गावात माझं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण हा विषय जसा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा विषय तितकाच माझ्याही आयुष्यात.
      5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणूनही साजरा करण्यात येतो. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. तसं पाहिलं तर मी  माझ्या आयुष्य आज पर्यंत जवळजवळ 100 शिक्षकांकडून तरी ज्ञान प्राप्त केले आहे. माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी संगणक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे तसेच आपणही शिक्षकच व्हावं या उद्देशाने मी बी.एड ही पूर्ण केले आहे. याच बरोबर अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. या सर्व शिक्षणामुळे मला अनेक शिक्षकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना प्रथम मी शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
     अनेक शिक्षक होऊन गेले सर्वच शिक्षकांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले पण याठिकाणी मी आवर्जून नमूद करावे वाटते असे शिक्षक म्हणजे श्री बंडोपंत राऊत (गुरुजी) व श्री विश्वास पाटील (सर).
    शिक्षक म्हणलं की याच दोन मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.  प्रथम मी श्री बंडोपंत राऊत गुरुजी यांच्या विषयी माझी कृतज्ञता व्यक्त करेन. हे माझे पाहिले शिक्षक जे मला प्राथमिक शिक्षक म्हणून एका वस्तीशाळेवर मला शिकवत होते. अत्यंत सुस्वभावी, सर्व विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्यात पारंगत होते. यांच्या मुळेच आज मी उच्च शिक्षण प्राप्त केले. यांनी शिकण्याची प्रेरणा माझ्या बरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही दिली होती. मला तर आठवतं राऊत गुरुजी आम्हा 3-4 विध्यार्थ्यांना एकाच वेळी  स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्या सायकल वरून 10 की.मी वर असणाऱ्या केंद्रावर न्यायचे. आजही ते त्याच तत्परतेने काम करताना मला दिसतात. आजही ते  समोरून जाताना मला स्मितहास्य देऊन पुढे जातात आणि दिवसभराची प्रेरणा देऊन जातात.
               या नंतर मला कृतज्ञता व्यक्त करावी वाटते ती म्हणजे श्री विश्वास पाटील (सर) यांच्याबद्दल.
हे गुरू म्हणजे कोणताही विषय सहज समजून सांगणारे चालते बोलते विद्यापीठच. आज जे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे त्यात पाटील सर यांचा मोलाचा वाटा आहे. यांच्याकडे आम्ही शिकवणी साठी जात होतो. यांची शिकवणी म्हणजे आमच्यासाठी शिक्षण क्षेत्रातील स्वर्ग होता. खूप चांगले शिक्षण देऊन आज यांनी आज अत्यंत बुद्धिवान विध्यार्थी तयार केले.
 
              या दोन शिक्षकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. याच बरोबर माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी एक सक्षम नागरिक बनलो याचे संपूर्ण श्रेय मी आपल्या सर्वांना देतो व पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो .
              .                                                                                                                  आपला नम्र
                                                                                                                          विकास किसन राऊत  
                                                                                                               (MCA.BJ.Bed)
                                                                                                               मु. पो मेडशिंगी
                                                                                                               ता. सांगोला
                                                                                                           जि. सोलापूर

नक्षत्रा (कविता)

माझ्यात रमणारी ती पहिलीच वेडी होती
मला स्वतःत सामावणारी ती पहिलीच होती
मला तिच्यात हरवून, वेड लावणारी तिचं होती
माझ्यावर तेव्हा प्रेम करणारी ती पहिलीच होती
                 
                   स्वतः जगण सोडून मला जगायला शिकवणारी तिची प्रीत होती
                   साखरेहुनही गोड तिची अन माझी सावनप्रीत होती.
                   माझ्या साठी मात्र ती सदाबहार गीत होती
                   माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

माझं मन राखून जगण्याची तिची भलतीच जिद होती
तिच्यात मी अन माझ्यात ती पूर्ण अधीन होती
प्रेमाखातर मात्र ती संपूर्ण माझ्यात लीन होती
माझ्यावर प्रेम करणारी ती वेडी पहिलीच होती.

                  इतक्या वेदना....... विखुरलेल्या स्वप्नांच्या
                  हरवलेल्या दिशांच्या... पसरलेल्या काळोखाच्या
                  क्षणात नाहीस करणारी ती जादुगारीन होती.
                  माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

लिहून तिला कळवावं म्हणतो,
माघारी मी तिच्याबद्दल खर काय ते लिहू शकतो
माझ्यासाठी काल ही आज ही ती नक्षत्रच होती
माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.
www.vikasparv.blogspot.com

                   
                   

Monday, August 27, 2018

सोशल मिडिया आणि मी

विदारक सत्य (फुल टायमपास )

         आपला भारत देश विकसनशील देश आहे. जगात भारत देश लोकसंखेच्या तुलनेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण मित्रांनो आपल्या देशाला एक भयानक रोग सतावतो आहे तो म्हणजे "सोशल मिडिया". या रोगाची प्रमुख लक्षण विचारलं तर  माणसाच माणूसपण हिरावून घेतो हा रोग.., स्वतः जगापेक्षा वेगळे आणि खूप हुशार आहोत याचा अहंकार मनात आणतो हा रोग. कुठलीही गोष्ट सगळ्यांच्या आधी मलाच माहित होते अशी भावना हा रोग झाल्यावर होते. यावर अजून तरी कुठे उपचार उपलब्ध नाही.
 
         सोशल मिडिया ही जितकी भयानक आहे असं मी म्हणतोय त्यापेक्षा ती कितीतरी पटीने फायद्याची आहे बर का मित्रांनो.... पण त्याचा वापर आज फक्त आणि फक्त मनोरंजन, सामाजिक तेढ निर्माण करणे, फुकटची प्रसिद्धी मिळवणे, आणि इतरांची उणी दुणी काढणे, बदनामी करणे यासाठीच केला जातोय हे अशोभनीय आहे.



         खर तर मोठ्या प्रमाणात इंटरनेट अगदी मोफत उपलब्ध झालं ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण यामुळे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान समजून घेता येऊ लागले. अनेक नवनवीन गोष्टीची माहिती आपणास सहज उपलब्ध होऊ लागली. परंतु आजचा माझा तरूण मित्र या नवनवीन माहिती पेक्षा तासनतास फेसबुक, व्हाटसअप ट्वीटर सारख्या सोशल मिडिया अॅपवर फक्त स्क्रोल खाली वर करत बसलेला असतो. बर ते ठीक आहे की तुम्ही या सर्वांचा वापर खूप करता, तुम्ही सोशल मिडिया वर खूप पारंगत आहात पण तुमच स्वतःच्या काय चांगल्या पोस्ट त्यावर असतात का?  हाही विचार आपण करूया. कुणाच्या तरी भंगार, टुकार पोस्ट ला आपण
धुरर्र.... कडक..... राडा..... अशा कॉमेंट करतो पण त्याचा आणि पोस्ट चा संदर्भ मला अजूनपर्यंत समजला नाही. मी याच्या विरोधात नाही पण पोस्ट आणि कॉमेंट यामध्ये थोडीशी साम्यता असावी असं मला वाटत.

        आता राहिला प्रश्न यु-ट्यूब सारख्या महान अप्लिकेशनचा. तर हे अॅप आजच्या तरूण पिढी, महिला, भगिनी यासाठी वरदानच आहे असं मी मानतो. जे जे शिकण्याची इच्छा आहे ते ते या एका अॅपवर आपणास मिळेल पण इथे शिकायचं कुणाला आहे, इथे तर आम्हाला फक्त मनोरंजन करायच आहे. या यु-ट्यूब ने मी आजवर खूप काही शिकलो कुठलही तंत्रज्ञान असो वा कोणतीही माहिती यावर सहज मिळते. पण आपण शोधतो त्या संस्कृती नसलेल्या बॉलीवूड च्या नट-नट्यांचे व्हिडीओ. अरे काय चाललंय काय. जरा भान बाळगूया आपण, परराष्ट्राच्या संस्कृतीच घाणेरड दर्शन आहे ते बॉलीवूड म्हणजे..... आणि तेच आपले आदर्श हिरो असतात म्हणे. अरे खर तर आपला बाप आपला हिरो, आदर्श  आणि आपल सर्व काही असलं पाहिजे. बापाच्या मनातून निघालेला धूर आपणास कधी दिसणार नाही पण एखाद्या टुकार मित्राच्या पोस्ट चा धूर लगेच दिसतो आपल्याला.

       आता तर मी माझ्या तरूण कर्तबगार मित्रांचा वाढदिवसाचा नवीनच ट्रेड पाहतो आहे. अरे काय ते सेलेब्रेशन असतं खूप अप्रूप वाटत मला. आणि त्यात ते स्टेटस पाहून तर मन अचंबित होत. पण मित्रानो याचा जास्त काही फायदा होत नसतो आपल्या आयुष्यात. अडचण आल्यावर तुमच्या ५००० मित्रापैकी फक्त 5 मित्र तुमच्या सोबत असू द्या मग मानतो राव तुम्हाला. फुकटचा खुळचट पणा म्हणायचं याला. ज्याच्या तोंडावर माशी पण बसत नाही त्याचे गावातल्या चौकात मोठ मोठे होर्डिंग पाहून मन अचंबित होत, अरे कशासाठी हे. तेच पैसे तू घरात एखाद्या कामाला लावून बघ किती समाधान असतं आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर.

       हे रोज मिळणार 1 जीबी इंटरनेट आपण सगळ्यात मोठे बेरोजगार आहोत याची जाणीवच होऊ देत नाही. रोज 1 जीबी इंटरनेट संपवावं वाटत असेल तर नक्कीच यु-ट्यूब वर नवनवीन कलात्मक गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती, शोधण्यावर नक्कीच खर्च करूया. उगाच कुणाच्या तरी पोस्टला लाईक कमेंट करत बसण्यापेक्षा आपले स्वतःचे विचार मांडूया. उगाच मोठा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तेच पैसे अनाथ आश्रमात एक दिवस खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप करूया. त्याची प्रसिद्धी नाही केली तरी चालेल पण आपल हेच काम कुणाच्यातरी जगण्याला उर्मी देऊन जाईल व आपल्याला मानसिक समाधान.

      बऱ्याच दिवसांची खंत मी या लेखातून अगदी कमी वेळेत आपल्या समोर मांडली आहे. यात अजून काही मुद्दे राहिलेही आहेत ते आपण या पोस्ट च्या कमेंट मध्ये लिहावेत.बऱ्याच मित्रांनी ही पोस्ट टोचू शकते सर्व लिखाण काल्पनिक आहे यात कोणी स्वतःला गुंतवून घेऊ नये. यासाठी तर मी या पोस्ट ला नाव देताना "सोशल मिडिया व मी" असेच दिले आहे, पण यातील जागृती नक्कीच लक्षात घ्यावी.
 धन्यवाद.....

आपला नम्र 
नवोदित लेखक 
श्री विकास राऊत (MCA, BJ, Bed)
9637790142

माझा शेतकरी राजा

शेतकरी माझा........           दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी.व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात य...