Monday, August 27, 2018

सोशल मिडिया आणि मी

विदारक सत्य (फुल टायमपास )

         आपला भारत देश विकसनशील देश आहे. जगात भारत देश लोकसंखेच्या तुलनेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण मित्रांनो आपल्या देशाला एक भयानक रोग सतावतो आहे तो म्हणजे "सोशल मिडिया". या रोगाची प्रमुख लक्षण विचारलं तर  माणसाच माणूसपण हिरावून घेतो हा रोग.., स्वतः जगापेक्षा वेगळे आणि खूप हुशार आहोत याचा अहंकार मनात आणतो हा रोग. कुठलीही गोष्ट सगळ्यांच्या आधी मलाच माहित होते अशी भावना हा रोग झाल्यावर होते. यावर अजून तरी कुठे उपचार उपलब्ध नाही.
 
         सोशल मिडिया ही जितकी भयानक आहे असं मी म्हणतोय त्यापेक्षा ती कितीतरी पटीने फायद्याची आहे बर का मित्रांनो.... पण त्याचा वापर आज फक्त आणि फक्त मनोरंजन, सामाजिक तेढ निर्माण करणे, फुकटची प्रसिद्धी मिळवणे, आणि इतरांची उणी दुणी काढणे, बदनामी करणे यासाठीच केला जातोय हे अशोभनीय आहे.



         खर तर मोठ्या प्रमाणात इंटरनेट अगदी मोफत उपलब्ध झालं ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण यामुळे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान समजून घेता येऊ लागले. अनेक नवनवीन गोष्टीची माहिती आपणास सहज उपलब्ध होऊ लागली. परंतु आजचा माझा तरूण मित्र या नवनवीन माहिती पेक्षा तासनतास फेसबुक, व्हाटसअप ट्वीटर सारख्या सोशल मिडिया अॅपवर फक्त स्क्रोल खाली वर करत बसलेला असतो. बर ते ठीक आहे की तुम्ही या सर्वांचा वापर खूप करता, तुम्ही सोशल मिडिया वर खूप पारंगत आहात पण तुमच स्वतःच्या काय चांगल्या पोस्ट त्यावर असतात का?  हाही विचार आपण करूया. कुणाच्या तरी भंगार, टुकार पोस्ट ला आपण
धुरर्र.... कडक..... राडा..... अशा कॉमेंट करतो पण त्याचा आणि पोस्ट चा संदर्भ मला अजूनपर्यंत समजला नाही. मी याच्या विरोधात नाही पण पोस्ट आणि कॉमेंट यामध्ये थोडीशी साम्यता असावी असं मला वाटत.

        आता राहिला प्रश्न यु-ट्यूब सारख्या महान अप्लिकेशनचा. तर हे अॅप आजच्या तरूण पिढी, महिला, भगिनी यासाठी वरदानच आहे असं मी मानतो. जे जे शिकण्याची इच्छा आहे ते ते या एका अॅपवर आपणास मिळेल पण इथे शिकायचं कुणाला आहे, इथे तर आम्हाला फक्त मनोरंजन करायच आहे. या यु-ट्यूब ने मी आजवर खूप काही शिकलो कुठलही तंत्रज्ञान असो वा कोणतीही माहिती यावर सहज मिळते. पण आपण शोधतो त्या संस्कृती नसलेल्या बॉलीवूड च्या नट-नट्यांचे व्हिडीओ. अरे काय चाललंय काय. जरा भान बाळगूया आपण, परराष्ट्राच्या संस्कृतीच घाणेरड दर्शन आहे ते बॉलीवूड म्हणजे..... आणि तेच आपले आदर्श हिरो असतात म्हणे. अरे खर तर आपला बाप आपला हिरो, आदर्श  आणि आपल सर्व काही असलं पाहिजे. बापाच्या मनातून निघालेला धूर आपणास कधी दिसणार नाही पण एखाद्या टुकार मित्राच्या पोस्ट चा धूर लगेच दिसतो आपल्याला.

       आता तर मी माझ्या तरूण कर्तबगार मित्रांचा वाढदिवसाचा नवीनच ट्रेड पाहतो आहे. अरे काय ते सेलेब्रेशन असतं खूप अप्रूप वाटत मला. आणि त्यात ते स्टेटस पाहून तर मन अचंबित होत. पण मित्रानो याचा जास्त काही फायदा होत नसतो आपल्या आयुष्यात. अडचण आल्यावर तुमच्या ५००० मित्रापैकी फक्त 5 मित्र तुमच्या सोबत असू द्या मग मानतो राव तुम्हाला. फुकटचा खुळचट पणा म्हणायचं याला. ज्याच्या तोंडावर माशी पण बसत नाही त्याचे गावातल्या चौकात मोठ मोठे होर्डिंग पाहून मन अचंबित होत, अरे कशासाठी हे. तेच पैसे तू घरात एखाद्या कामाला लावून बघ किती समाधान असतं आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर.

       हे रोज मिळणार 1 जीबी इंटरनेट आपण सगळ्यात मोठे बेरोजगार आहोत याची जाणीवच होऊ देत नाही. रोज 1 जीबी इंटरनेट संपवावं वाटत असेल तर नक्कीच यु-ट्यूब वर नवनवीन कलात्मक गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती, शोधण्यावर नक्कीच खर्च करूया. उगाच कुणाच्या तरी पोस्टला लाईक कमेंट करत बसण्यापेक्षा आपले स्वतःचे विचार मांडूया. उगाच मोठा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तेच पैसे अनाथ आश्रमात एक दिवस खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप करूया. त्याची प्रसिद्धी नाही केली तरी चालेल पण आपल हेच काम कुणाच्यातरी जगण्याला उर्मी देऊन जाईल व आपल्याला मानसिक समाधान.

      बऱ्याच दिवसांची खंत मी या लेखातून अगदी कमी वेळेत आपल्या समोर मांडली आहे. यात अजून काही मुद्दे राहिलेही आहेत ते आपण या पोस्ट च्या कमेंट मध्ये लिहावेत.बऱ्याच मित्रांनी ही पोस्ट टोचू शकते सर्व लिखाण काल्पनिक आहे यात कोणी स्वतःला गुंतवून घेऊ नये. यासाठी तर मी या पोस्ट ला नाव देताना "सोशल मिडिया व मी" असेच दिले आहे, पण यातील जागृती नक्कीच लक्षात घ्यावी.
 धन्यवाद.....

आपला नम्र 
नवोदित लेखक 
श्री विकास राऊत (MCA, BJ, Bed)
9637790142

Friday, August 24, 2018

टॉपर मुली?

लग्नानंतर कुठे जातात या टॉपर मुली?


सोशल मीडियावर एक जोक फिरत होता... मुली बोर्डात टॉप, mpsc मध्ये टॉप, इंजिनीरिंग डॉक्टरकी मध्ये टॉप... मग बहुतांश शास्त्रज्ञ आणि मोठमोठे लोकं पुरुष का असतात? तेव्हा कुठे जातात या टॉपर मुली..?
मग थोडा खोलवर विचार केला की, या टॉपर मुली तेव्हा नाती सांभाळत असतात, कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात, कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.

मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही, आणि मग अचानक लग्न होतं, आणि एक मोठी जबाबदारी येऊन पडते... मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण आजही अशी परिस्थिती आहे की लग्नानंतर सासरची मंडळी या सर्व गोष्टींना नगण्य मानतात, मुलींचं शिक्षण, त्यांचं करिअर या गोष्टींपेक्षा तिला स्वयंपाक आणि घरातली कामं किती येतात यावरून तिची पारख होते. एखादी टॉपर असेल, पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून? साधा स्वयंपाक येत नाही..."



याउलट एखादी पहिली नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल तर "फार हुशार आहे हो, काय स्वयंपाक बनवते.." भाजीत तेल जास्त झाले, मीठ कमी झाले, मसाला कमी पडला, पोळ्या कडक झाल्या किंवा भाजी पातळ झाली तर अक्षरशः मुलीच्या आणि तिच्या खानदानाचा उद्धार करणारे बरेच असतात... "खुशाल नोकरीवर जातेस, घरी सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात" "नुसती करायची म्हणून कामं करतेस, भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.." "मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही" "डोळे खाली करून बोलायचं,मोठ्या आवाजात बोललीस?? (गालावर खाडकन ...) या सगळ्या चक्रव्यूहात या मुली अडकत जातात अडकत जातात आणि बाजूला राहतं ते त्यांचं शिक्षण आणि हुशारी.

कोणीही पोटातून शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलीला सगळं शिकायला आणि नीट जमायला बराच वेळ लागेल हे कोणी समजून घेतं का??

लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही म्हणून का त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली?? माझी  एक मैत्रीण, भाग्यश्री ...अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं.. मोठे क्लासेस लावले.. चांगले कॉलेज पाहिले..ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा..

अशीच माझी एक मैत्रिण भाग्यश्री . काही दिवसांपूर्वी भेटली, शाळेत नेहमी पुढेपुढे करणारी,  अभ्यासात अत्यंत हुशार ...
1 वर्षाच्या मुलाला घेऊन आलेली, "आणि विचारते की तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल" ऐकून धक्का बसला, विचारपूस केल्या नंतर कळलं, तिच्या आई वडिलांनी अमाप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं, पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... बायकोला कामावर जाऊ देत नसे, मुल होण्यासाठी घाई केली आणि भाग्यश्रीला  त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, भाग्यश्री ने घरी बसून काही उद्योग करावा हेही तिच्या नवऱ्याला आवडत नसे, बाळाला सांभाळायला तयार नसे...

मनात विचार आला, एखादं टाइम मशीन पाहिजे होतं, 7 वर्षा नंतर आपली टॉप आलेली मुलगी कुठे असेल हे आई वडिलांना त्यात दिसायला पाहिजे होतं... आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, की कुठे जातात या टॉपर मुली... असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात...कधी त्या आपल्यातच असतात..!!!
  
(हा ब्लॉग मुली संधर्भात वाचण्यात आलेल्या लेखावरून लिहिण्यात आला आहे. सत्य परिस्थिती मांडणाचा प्रामाणिक प्रयत्न आपला अभिप्राय मला अजून काम करण्यास उद्युक्त करतात)
www.vikasparv.blogspot.com

Tuesday, August 21, 2018

वर्तमान जीवन जगा

वर्तमानात जगा
माणूस विचार करणारा प्राणी आहे. त्यामुळे सतत त्याच्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतो.माणसाला खरे तर भविष्याची काळजी अधिक सतावत असते. त्यामुळे तो सतत डोक्यात राख घालून घेऊन वावरत असतो. भविष्याची काळजी करत असताना तो प्रत्यक्षात भुतकाळातल्या घटनांशी चिकटून बसलेला असतो. साहजिकच त्याची प्रगती होताना दिसत नाही. कारण तो वर्तमानात जगतच नसतो. वास्तविक आपण मागचा-पुढचा विचार न करता वर्तमानात भरभरून जगलं पाहिजे. वर्तमान कसा जगला यावर भविष्य अवलंबून आहे. माणसाने गेलेल्या गोष्टी विसरून पुढे पुढे गेले पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पाणी. पाणी जोपर्यंत वाहत असते,तोपर्यंत ते स्वच्छ,निर्मळ, ताजे असते. ते एकाच ठिकाणी साठले म्हणजे मात्र त्याला दुर्गंधी यायला लागते. त्यात अपायकारक जीव-जंतू वाढायला लागतात. तसे स्वत:लाही चांगले, काही तरी खास बनवायचे असेल तर पुढे पुढे जात राहिले पाहिजे. वाटेत येणार्‍या समस्या, अडथळे दूर सारून स्वत:ला एक अनुभवसिद्ध बनवले पाहिजे.त्याचाच उपयोग आपल्या भावी जीवनात होत असतो.

 काही माणसे भुतकाळात यशस्वी झालेल्या महान व्यक्तींचे विचार आत्मसात करतात. पण असेही काही माणसे असतात की, ते भुतकाळातील लोकांमध्ये आणि भुतकाळात आपल्यासोबत घडलेल्या घटनांमध्येच हरवून जातात. अशी माणसे आजच्या संबंधीत गरजा, समस्या आणि त्याच्या जाणिवा यांची काळजी करताना दिसत नाहीत. खरे तर जुन्या-नव्या आणि भुत-वर्तमान यांची सांगड घालून आयुष्य जगायचे असते. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य यशस्वी बनवायचे असते. जर तुम्ही भुतकाळात आणि त्यातल्या घटनांमध्येच अडकून पडलात तर मात्र तुम्ही त्याचा विचार करून करून त्रासून जाणार.अशा लोकांना मग वर्तमानापेक्षा भविष्याचीच अधिक चिंता लागून राहिलेली असते. ही माणसे विचार करतात की, आपला वर्तमान कसाही असू दे,पण भविष्यकाळ मात्र जबरदस्त असला पाहिजे. पण त्यांना याची जाणीव नसते की, ते आपला वर्तमान योग्य प्रकारे जगत नाहीत,तिथे भविष्याची गॅरंटी कोण देणार? वर्तमानावरच भविष्य अवलंबून असते.

महात्मा गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, तुमचे भविष्य तुम्ही आज काय करताय, या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे भूत आणि भविष्याची काळजी सोडून वर्तमान चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कामाला लागा. हीच सुखद जाणीव आहे. जर तुम्ही आजचा उपयोग योग्य प्रकारे करू शकलात तर तुमचे भविष्यदेखील उज्ज्वल असणार आहे.
वर्तमान चांगला बनवण्यासाठी आपण आपल्यापेक्षा मोठ्या किंवा महान व्यक्तींच्या भूतकाळातून काही शिकण्याची आवश्यकता नाही.जर शिकण्याची दृष्टी असेल तर आपण आपल्या वयाच्या छोट्या व्यक्तीकडूनदेखील शिकू शकतो.स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी काही ऊर्जावान लोकांच्या भेटी घ्यायला हव्यात. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. विशेष म्हणजे आपण आशावादी राहिले पाहिजे. आशा केल्याने जीवनात नव्या आशेचा संचार होतो.www.vikasraut.blogspot.com
शब्दांकन :- श्री विकास राऊत ९६३७७९०१४२

Monday, August 20, 2018

गरुडझेप

गरुडझेप

           आई-वडील दोघेही सर्व सामान्य. रा. बलवडी मुलगाही शाळेत अत्यंत हुशार म्हणून लगेच कोणत्याही इंग्रजी शाळेत त्याला न घालता त्यांनी विश्वास टाकला तो नाझऱ्यामधील श्रीधर कन्या प्रशालेवर, यामुळे शाळेसाठी दररोज करावा लागणारा सात किलोमीटरचा प्रवास कधी सायकल तर कधी वडिलांबरोबर. सकाळी शाळेला आले की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. जयदीप नेताजी शिंदे असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे. जयदीपने ३०० पैकी २६४ गुण मिळविले. 
           शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यश आणि सांगोला तालुक्यातील नाझरे या अत्यंत ग्रामीण भागातील श्रीधर कन्या प्रशाला शाळा हे समीकरण अलीकडे घट्ट झाले आहे. फक्त जयदीपच नव्हे तर याच शाळेची विद्यार्थिनी कु. प्रेरणा संभाजी पवार हिनेही इ पाचवी मधून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. प्रेरणाने भाषा व गणित  विषयांत १४० गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत १२८ गुण असे एकूण २६८ गुण मिळवले या शाळेचे तब्बल 11 विध्यार्थी राज्य शासनाच्या गुणवत्ता यादीत आले आहेत तसेच  यापूर्वी अनेक  विद्यार्थी  शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. याच शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी फक्त शिष्यवृत्तीच नव्हे तर महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्वच
परीक्षेत यापूर्वीदेखील घवघवीत यश प्राप्त केले आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश परिचारक यांचे नियोजन, सर्वच शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे शक्‍य झाले आहे.

          जयदिपचे घर शाळेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत सकाळी सात वाजता तो आपल्या वडिलांबरोबर येतो तर कधी स्वतः सायकलवर.  दोन तास शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास मार्गदर्शक शिक्षक घेतात. येताना आणलेला डबा दहा वाजता खाऊन पुन्हा ११ ते ५ पर्यंत नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो. विशेष म्हणजे या शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे याचे कारण सेवाभावी वृत्तीने शिक्षक हे काम करतात.

           जयदीपने भाषा व गणित विषयांत १३२ गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत  १३२ गुण मिळवले आहेत. पहिलीपासून तो विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवत आहे. त्याच्या मेहनतीच्या बळावर आणि श्रीधर कन्या प्रशालेत शिकवल्या जाणाऱ्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्याला यश मिळाले आहे. या शाळेने आजवर असंख्य गुणवंत विद्यार्थी बनवले आहेत. श्रीधर कन्या प्रशाला ही मराठी व सेमी माध्यमाची शाळा प्रत्येक शैक्षणिक बाबीत नेहमीच अग्रेसर असते त्यामध्ये या परिक्षांबरोबरच कला क्षेत्रातील एलमेंटरी व इंटरमेडीएट परिक्षात आजपर्यंत 100% निकालाची परंपरा आहे तसेच दहावी व बारावी बोर्डाचा निकाल व NMMS परीक्षा, मंथन परीक्षा निकालात नेहमीच अग्रेसर  असणाऱ्या या शाळेचे 2 विद्यार्थी आज राज्यपातळीवर झळकले याचा सार्थ अभिमान संस्था अध्यक्षा रुद्रम्मादेवी पाटील, उपाध्यक्षा यमुना पाटील,  सहसचिव मुकुंदराव पाटील, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश परिचारक  सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांना सार्थ अभिमान आहे तसेच कै वसंतराव पाटील यांनी ज्या उद्देशाने शाळेची स्थापना केली तो उद्देश आज साध्य झाल्याने त्यांनाही आज प्रशालेकडून या उज्वल यशाच्या माध्यमातून आदरांजली मिळाली तसेच कोणत्याही शाळेच्या वरवरच्या रुपाकडे न पाहता अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच यश मिळते असा गैरसमज न बाळगता श्रीधर कन्या प्रशाला सारख्या शाळेत येऊन प्रत्यक्ष गुणवत्ता पाहून आपल्या पाल्यांना प्रवेश घेतल्यास त्यांचे भविष्य उज्वल असेल याची खात्री वरील या 2 विद्यार्थ्यांच्या उदारहारांवरून देता येते. 
            लेखाच्या शेवटी प्रशाला व गुणवंत जयदीप व प्रेरणा यांच्या बद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटत की तुम्ही  
कष्ट इतकं शांततेत केलं की आज तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण राज्यात पोहचला. अभिनंदन.
शब्दांकन:- श्री विकास राऊत

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...