Friday, August 24, 2018

टॉपर मुली?

लग्नानंतर कुठे जातात या टॉपर मुली?


सोशल मीडियावर एक जोक फिरत होता... मुली बोर्डात टॉप, mpsc मध्ये टॉप, इंजिनीरिंग डॉक्टरकी मध्ये टॉप... मग बहुतांश शास्त्रज्ञ आणि मोठमोठे लोकं पुरुष का असतात? तेव्हा कुठे जातात या टॉपर मुली..?
मग थोडा खोलवर विचार केला की, या टॉपर मुली तेव्हा नाती सांभाळत असतात, कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात, कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.

मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही, आणि मग अचानक लग्न होतं, आणि एक मोठी जबाबदारी येऊन पडते... मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण आजही अशी परिस्थिती आहे की लग्नानंतर सासरची मंडळी या सर्व गोष्टींना नगण्य मानतात, मुलींचं शिक्षण, त्यांचं करिअर या गोष्टींपेक्षा तिला स्वयंपाक आणि घरातली कामं किती येतात यावरून तिची पारख होते. एखादी टॉपर असेल, पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून? साधा स्वयंपाक येत नाही..."



याउलट एखादी पहिली नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल तर "फार हुशार आहे हो, काय स्वयंपाक बनवते.." भाजीत तेल जास्त झाले, मीठ कमी झाले, मसाला कमी पडला, पोळ्या कडक झाल्या किंवा भाजी पातळ झाली तर अक्षरशः मुलीच्या आणि तिच्या खानदानाचा उद्धार करणारे बरेच असतात... "खुशाल नोकरीवर जातेस, घरी सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात" "नुसती करायची म्हणून कामं करतेस, भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.." "मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही" "डोळे खाली करून बोलायचं,मोठ्या आवाजात बोललीस?? (गालावर खाडकन ...) या सगळ्या चक्रव्यूहात या मुली अडकत जातात अडकत जातात आणि बाजूला राहतं ते त्यांचं शिक्षण आणि हुशारी.

कोणीही पोटातून शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलीला सगळं शिकायला आणि नीट जमायला बराच वेळ लागेल हे कोणी समजून घेतं का??

लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही म्हणून का त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली?? माझी  एक मैत्रीण, भाग्यश्री ...अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं.. मोठे क्लासेस लावले.. चांगले कॉलेज पाहिले..ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा..

अशीच माझी एक मैत्रिण भाग्यश्री . काही दिवसांपूर्वी भेटली, शाळेत नेहमी पुढेपुढे करणारी,  अभ्यासात अत्यंत हुशार ...
1 वर्षाच्या मुलाला घेऊन आलेली, "आणि विचारते की तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल" ऐकून धक्का बसला, विचारपूस केल्या नंतर कळलं, तिच्या आई वडिलांनी अमाप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं, पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... बायकोला कामावर जाऊ देत नसे, मुल होण्यासाठी घाई केली आणि भाग्यश्रीला  त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, भाग्यश्री ने घरी बसून काही उद्योग करावा हेही तिच्या नवऱ्याला आवडत नसे, बाळाला सांभाळायला तयार नसे...

मनात विचार आला, एखादं टाइम मशीन पाहिजे होतं, 7 वर्षा नंतर आपली टॉप आलेली मुलगी कुठे असेल हे आई वडिलांना त्यात दिसायला पाहिजे होतं... आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, की कुठे जातात या टॉपर मुली... असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात...कधी त्या आपल्यातच असतात..!!!
  
(हा ब्लॉग मुली संधर्भात वाचण्यात आलेल्या लेखावरून लिहिण्यात आला आहे. सत्य परिस्थिती मांडणाचा प्रामाणिक प्रयत्न आपला अभिप्राय मला अजून काम करण्यास उद्युक्त करतात)
www.vikasparv.blogspot.com

3 comments:

  1. हा माझा लेख असून याचे सर्व हक्क माझ्याकडे आहे, माझ्या नावासकट कृपया लेख टाकत चला

    ReplyDelete

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...