Sunday, August 2, 2020

माझा शेतकरी राजा


शेतकरी माझा........

          दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी.व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. एकीशी प्रेम, दुसरीशी लफडं आणि तिसरीशी बिझनेस. चौथी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहून त्याचं अकौंट झिरो करते. म्हणे गुणी कलावंत. हत्या की आत्महत्या यावर दोन महिने चर्वित-चर्वण चाललंय. कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय? 33000 शेतकर्‍यांनी शेता-बांधावरच्या झाडांना लटकवून आपला जीवन प्रवास संपवला. त्यांची मुलं-बाळं उघड्यावर पडली. किती जणांनी मेणबत्ती मोर्चे काढले? किती जणांनी शासनाला जाब विचारला? किती निर्माते उपाशी झोपले?
           अहो इथे विधवा पत्नी, अनाथ मुलं असहाय्य आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला. चार्‍यावाचून ती मुकी जनावरे तडफडून मेली. बँक अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी दहाव्यालाच हजर. अशावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाने न्याय मागायचा कुणाकडे? सुशांत सिंह राजपूतकडे तर कोट्यावधी रुपये होते. त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेक जणींनी त्याला लुटलं. इथं शेतकर्‍याला निसर्ग आणि शासन व्यवस्था लुटते. त्याच्यासाठी कधी तरी अश्रू ढाळणार की नाही?
              मी ‘नाम’ संस्थेच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचं अभिनंदन करतो. त्यांनी हजारो विधवांना रोखीने - चेकने अर्थसाह्य करून त्यांच्या जीवनात थोडा आनंद पेरण्याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूत कोट्यावधी रुपये कमावून प्रेम-लफडी करून मानसिक दिवाळखोरीत जात आत्महत्या करत असेल तर त्याला एक न्याय व शेतकर्‍याला दुसरा न्याय हे कसं काय? म्हणजे, पडद्यावर नाचणारा, प्रेम- लफडी करून ‘पेज थ्री’ पार्ट्या झोडपणारा ‘माणूस’?, दररोज 12-14 तास काबाडकष्ट करून तुटलेल्या - फुटलेल्या घरात राहून आपल्या पत्नी-मुलांबाळांचं संगोपन करू पाहणारा ‘कचरा’? कुणीही यावे ‘डस्टबिन’ मध्ये टाकावे? या समाजव्यवस्थेचीच चीड येते.
            सध्या कोरोनाचा महाभयंकर काळ सुरू आहे. या चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दोन वेळचं जेवू कोण घालतोय? शेतकरी! तो राबतोय म्हणून आपण खातोय! तो घरात बसला असता तर आपलाही ‘सुशांत’ झाला असता. त्याच्या पदरात काय पडतंय? 10 रु. किलो टोमॅटो, 5 रु. कि. कांदे, 10 रु. कि. बटाटे, 2 रु. मेथीची जुडी, 2 रु. कोथिंबीर जुडी, 18 रु. लि. दूध. चार टेम्पो शेतकर्‍याचा माल विकून जेवढा पैसा येईल, तेवढ्या पैशात ‘सुशांत’ रोज सकाळी नाश्ता करायचा. आणि आपल्या मैत्रीणींनाही खावू घालायचा. नाश्ता, जेवण जेव्हा संपलं तेव्हा त्यांनी टांग वर केली आणि यानेही आपला बिस्तरा गुंडाळला. टी. व्ही. मिडीया, वृत्तपत्र मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी. विदारक चित्र आहे.
            माझा विरोध इतकाच आहे की ज्यांना भारतीय संस्कृतीत तिळमात्र इंटरेस्ट नाही त्यांना फक्त पैसा या एकाच संकल्पनेत जगायचं आहे, त्यांना आपण कशासाठी उचलून धरायचं.! शोधायला गेलं तर आपल्या स्वतःच्या जीवनसाथीशी यांना एकनिष्ठ राहता येत नाही ते देशाशी के एकनिष्ठ राहतील. त्यामुळे या नट-नट्यांना सोडून माझा आपला शेतकरी टिकला पाहिजे, शेतीसाठी नवेनवे प्रयोग आले पाहिजेत, शेतकरी प्रोत्साहित झाला पाहिजे यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

शब्दांकन:- श्री विकास राऊत(MCA, BJ, Bed)

Wednesday, April 15, 2020

या ऋतु मधला पहिला पाऊस

Vikaskraut@gmail.comपहिला पाऊस …

पहिला पाऊस … आत्ता नुकताच या वर्षातला पहिला-वहिला पाउस पडला .पाउस तर अगदीच थोडा पडला पण या पहिल्या पावसाचा तो सुगंध मनात मात्र  दरवळत राहील .लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ,न चुकता सर्वांनाच हा सुगंध येताच पटकन जाऊन ती ओली-ओली माती खावीशी वाटण्याची ही भावना अदभूत आहे .
                         
                            आज पहिला तो पाऊस
                            गारवा देऊन गेला ,
                            गारव्यात त्या अनोखी
                            एक आठवण देऊन गेला  …..

पहिल्या पावसाच्या सुगंधात का कुणास ठाऊक पण मनातल्या कोपर्यात दडलेल्या ,किंबहुना आपल्याला परिस्थितीपायी दडवाव्या लागलेल्या त्या खास आठवणी नकळत उफाळून येतात आणि सुरु करतात बाहेरच्या पावसासोबत ,मनात आठवणींच्या पावसाचा खेळ ….
                         
                            थेंबांच्या त्या गारव्यात
                            एक आठवण देऊन गेला ,
                            आज न भिजताच
                            मला हा चिंब भिजवून गेला  ……

आयुष्यात पहिल्या येणाऱ्या गोष्टंच ,त्या पहिल्या क्षणांचे मोल हे ते क्षण निघून गेल्यावरच कळत ,जस पाहिलं प्रेम .काय जादू असते त्या पहिल्या प्रेमात ,त्या क्षणांमध्ये कि आजपण त्या आठवणी ,मन व्यापून टाकतात .कितीही दाबून टाकल्या तरी या पहिल्या पावसाच्या सुगंधात त्या हळूच डोक वर काढतात .मग सुरु होतो थेंबांचा तो अनोखा खेळ ,बाहेर रप-रप पडणारे पावसाचे ओले-ओले थेंब आणि इथे मनात रिप-रिप पडणारे आणि चिंब भिजवून टाकणारे ,आठवणींचे ते थेंब …

                           बाहेरचा तो पाऊस
                           हे शरीर भिजवून गेला
                           पण ,
                           आठवणींचा आतला पाऊस
                           डोळे पण भिजवून गेला …...

आठवणी चांगल्या असो वा वाईट ,पण त्या आठवणीच असतात ,कितीही आवडल्या तरीही त्या जुन्याच असतात .काही क्षणांसाठी आल्या तरी त्या सोडून पुढच आयुष्य जगावच लागत .थेंब छोटा असो वा मोठा ,तो अंगावर पडल्यावर भिजावच लागत .पाउस तर थांबला थोड्याच वेळात ,पण या आठवणी नाही थांबत ,कितीपण गरम भजे खाल्ले तरी ,आठवणींचा हा गारवा नाही थांबत .....
                       
                            काही क्षण का होईना
                            तिची साथ देऊन गेला
                            आणि ,
                            आजचा हा पहिला पाउस
                            अनोखा गारवा देऊन गेला ……
पहिला पाऊस 

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...